@महिमानगड@
महिमानगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. माण तालुका हा सातार्याच्या पुर्व भागातील तालुका आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर सातार्यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आहे.
महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे नावाचे गाव आहे. तर उत्तर पायथ्याला महिमानगड वाडी आहे. उकीर्डेकडूनही गडावर जाता येते. अर्थात ही वाट नेहमीची चढाईची नाही. काहीशी अवघड असून ती तुटक्या तटबंदीमधून गडात शिरते.
महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्ग आहे. या मार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची तटबंदी सुरेख दिसते. महिमानगडवाडी किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहे.
मंदिरापासून एक वाट गडावर जाते. या वाटेवरुन गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणाने ही वाट दरवाजापर्यंत जाते. या वाडीतील जनावरे अनेकदा गडावर चरायला नेतात. त्यामुळे अनेक ढोरवाटा तयार झालेल्या आहेत.
या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पैकी एकात झाडी गच्च माजलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे. तिसर्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळे वाटेवर येवू शकतो. येथून गडात शिरणारा मार्ग दिसतो. तो उत्तरेकडून असला तरी तो वळवून आत घेतला आहे. आत मधे दरवाजा पुर्वाभिमुख बांधलेला होता.
इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. अर्थात हे दृष्य अनेक ठिकाणी पहायला मिळते. पण महिमानगडाच्या या झाडाची तर्हाच काही और आहे. हे झाड उभे वाढलेले नाही तर आडवे वाढले आहे. ते जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे. त्याचे वजन त्या तटबंदीने कसे पेलले याचे आश्चर्य वाटते.
महिमानगडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या बाजूला देखणे असे हत्ती कोरलेले आहेत. कोणीतरी तिथली दगडमाती काढल्यामुळे हे हत्ती दिसू लागले आहेत. दरवाजाच्या समोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले होते, असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते.
शत्रूपासून नाही पण काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. डावीकडील वाट गडाच्या माथ्यावर जाते. तर समोरची वाट तटबंदीकडे जाते. या वाटेने तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडीदरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे.
गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर ही दिसतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष एक कबर. एक हनुमानाचे मंदिर तसेच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.
या माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. असे टाके इतर किल्ल्यांवर आढळत नाही. अर्थात हे टाके पुर्वी बुजलेले होते.