चंदन वंदन गड...
सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे.
कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ ला जिंकून स्वराजाची मुहुर्तमेढ रोवली हे पुढे येत आहे. अफझलखान वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केले. व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी ठेवली. १६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.
पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.
गडावरील पाहण्याची ठिकाणे.
अ) चंदनगडावरील वास्तू :-
महादेव मंदिर :- चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंगे असलेले महादेव मंदिर आहे. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले.
दगडी मिनार :- गडावर प्रवेश करतानाच राजा भोजाने उभारलेल्या दोन दगडी मिनारी आपले स्वागत करताना दिसतात.
दगडी चौथारा :- चंदनगडाच्या मध्यभागी एक पायापर्यंत बा़ंधलेला चौथरा आहे.
गडाच्या नैर्ऋत्य बाजूस दारूगोळा कोठार आहे..
गडाच्या वायव्येस एक बुरूज असून शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी आढळते. तिच्यावर एका बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.
ब) वंदनगडावरील वास्तू :-
प्रवेशद्वार :- वंदनगडावर मराठा स्थापत्य शैलीतील एक प्रवेशद्वार आहे. त्यावर कीर्तिचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेली आढळते.
दुसरे प्रवेशद्वार :- पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते. सध्या ते मातीत बुजले आहे.
भोजकालीन प्रवेशद्वार :-हे दार पन्हाळ्यावरील प्रवेशदाराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.याच्यावर एक शिलालेख फारशी भाषेत तर दुसरा मोडी लिपीत आहे. यात यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळतो. या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग आहे. तुळाजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवले असावे.
खंदक :- गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाईंनी हा बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली होती.
पाच तलाव:- वंदनगडावर पायऱ्या असलेली पाच तळी होती. यापैकी एक बुजले असून चार तळी सुस्थितीत आहेत.
महादेव मंदिर :- गडाच्या पूर्वेस बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्परी मंदिर आहे.
काळूबाई मंदिर :- गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर आहे.
समाधी :- गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत.
दारूगोळा कोठार :- तीन दालने असलेले हे कोठार गडाच्या मध्यभागी आहे.
राजवाडा :- गडावर पुरातन राजवाडा आण़ि त्याचे अवशेष पहावयास मिळतात.
बालेकिल्ला :- गडावर एक टेकडी असून तिला बालेकिल्ला म्हणतात. यावर एका बुरुजाचे तसेच इमारतीचे अवशेष आहेत.तिथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या.
पडकी घरे :- गडाच्या पूर्वेस तसेच वायव्य दिशेस शेकडो पडक्या घरांचे अवशेष आढळतात.
गडाच्या दक्षिणेस एक चोरवाट आहे.
चुन्याची घाणी :- वंदनगडावर पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक या प्रमाणे चाके नसलेल्या चुन्याची घाणी आहेत.
No comments:
Post a Comment